ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री
10 शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. 11 सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. 12 कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. 13 या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल 14 तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. 15 शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. 16 नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा. 17 आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या, 18 प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.