20 मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहूद्यांना पत्रे पाठवली, 21 दरवर्षी अदार महिन्याचा चौदावा आणि पंधरावा दिवसही अगत्याने पाळावा, 22 त्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहूद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
23 मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी सुरवात केली होती तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला. 24 हम्मदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहूद्यांचा शत्रू होता. त्याने यहूद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहूद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. 25 परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखीत आज्ञा काढली की, कपटी हामानाने यहूदी लोकांविरूद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी. 26 यास्तव पूर या शब्दावरून "पुरीम" असे म्हणत, म्हणून या दिवसास "पुरीम" नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्याबाबतीत जे घडले होते त्यामुळे यहूद्यांनी ही प्रथा स्विकारली. 27 यहूद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्विकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजासाठी व जो प्रत्येकजन त्यांना जोडलेले आहे तो. आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येकवर्षी त्याच वेळी साजरे करावे. 28 प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील. 29 मग अबीहाईल ची कन्या राणी एस्तेर आणि यहूदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. 30 राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील एकशेसत्तावीस प्रांतांमधील समस्त यहूद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती. 31 पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहूदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहूद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहूद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. 32 पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले. आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.