मोशेचा जन्म
1 लेवी वंशातील एका मनुष्याने जाऊन लेवीच्या एका मुलीशी विवाह केला. 2 ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले. 3 पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली. 4 त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली. 5 त्या वेळी फारोची मुलगी आंघोळ करण्यासाठी नदीवर आली. तिच्या दासी नदीच्या किनाऱ्यावर फिरत होत्या. तिने लव्हाळ्यात ती पेटी पाहिली; आणि एका दासीला तिकडे जाऊन ती पेटी आणण्यास सांगितले. 6 तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, "खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे." 7 मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, "या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?" 8 फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली. 9 फारोच्या मुलीने त्या बाळाच्या आईला म्हटले, "या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्यास दूध पाज; त्याबद्दल मी तुला वेतन देईन." तेव्हा ती स्त्री बाळाला घेऊन त्यास दूध पाजू लागली. 10 ते मूल वाढून मोठे झाले. तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे आणले; आणि तो तिचा मुलगा झाला; तिने त्याचे नाव मोशे अर्थ-पाण्यातून बाहेर काढलेलाठेवले, ती म्हणाली, "कारण मी त्यास पाण्यातून बाहेर काढले."