येशू ख्रिस्ताची वंशावळ
1 अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. 2 अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. 3 यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. 4 अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, 5 सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
6 आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. 7 शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला. 8 आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, 9 उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, 10 हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, 11 आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
12 बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला. 13 जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. 14 अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. 15 एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, 16 याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. 17 अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.