Pular para o conteúdo
Publicidade

1 राजे 17

एलीयाहद्वारे मोठ्या दुष्काळाची घोषणा

1 गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह17:1 एलीयाह मूळ प्रतीमध्ये बहुतेक ठिकाणी हे नाव एलीयाहू असे लिहिलेले आहे तिश्बे अहाबाला म्हणाला, "याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही."

कावळ्यांद्वारे एलीयाहचे पोषण

2 तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: 3 "येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा. 4 त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे."

5 म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला. 6 सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.

एलीया आणि सारेफथची विधवा

7 काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता. 8 मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: 9 "सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा." 10 तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, "एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?" 11 ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, "आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये."

12 ती म्हणाली, "याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ."

13 एलीयाह तिला म्हणाला, "भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव. 14 कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ "

15 ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे. 16 एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

17 काही काळानंतर जी घर मालकीण स्त्री होती तिचा मुलगा आजारी पडला. त्याचा आजार वाढतच गेला आणि त्याचा श्वास थांबला. 18 ती एलीयाहला म्हणाली, "अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?"

19 एलीयाह म्हणाला, "तुझ्या मुलाला माझ्याकडे आण." त्याने त्याला तिच्या हातून घेतले आणि माडीवरील खोलीत जिथे तो राहत होता तिथे नेऊन आपल्या बिछान्यावर ठेवले. 20 मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, "याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?" 21 मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, "याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!"

22 याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला. 23 मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, "पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!"

24 तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, "आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.