2 पलिष्ट्यांनी इस्राएलशी युद्ध करण्यासाठी त्यांचे सैन्य तैनात केले आणि जसे युद्ध वाढत गेले तसा पलिष्ट्यांद्वारे इस्राएलचा पराभव झाला, त्यांच्यापैकी सुमारे चार हजार लोकांना युद्धभूमीवर मारले गेले. 3 जेव्हा सैनिक छावणीकडे परत आले तेव्हा इस्राएलच्या वडीलजनांनी विचारले, "याहवेहने आज पलिष्ट्यांसमोर आमचा पराभव का होऊ दिला? आपण शिलोह येथून याहवेहच्या कराराचा कोश घेऊन येऊ, यासाठी की ते आपल्याबरोबर जाऊन आपल्या शत्रूच्या हातातून आपल्याला वाचवतील."
4 म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
5 जेव्हा याहवेहच्या कराराचा कोश छावणीमध्ये आला, तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी इतका मोठा जयघोष केला की, जमीन हादरली. 6 तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले "इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?"
जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे, 7 तेव्हा पलिष्टी लोक घाबरून गेले. "देव छावणीत आले आहेत," ते म्हणाले, "अरेरे! असे अद्याप कधीच घडले नव्हते. 8 आम्हास हाय हाय! या शक्तिमान देवाच्या हातून आम्हास कोण सोडवेल? ते तेच देव आहेत ज्यांनी रानात इजिप्तच्या लोकांवर प्रत्येक प्रकारच्या पीडा आणून त्यांचा नाश केला. 9 पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!"
10 तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले. 11 परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.