मंडळीचे अध्यक्ष आणि सेवक याची गुणवैशिष्टे
1 हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो. 2 तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा. 3 तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा. 4 तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे. 5 (ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?) 6 अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल. 7 तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.