Pular para o conteúdo
Publicidade

2 इतिहास 10

इस्राएलचे रेहोबोअमविरुद्ध बंड

1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते. 2 जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता. 3 तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले: 4 "तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू तुम्ही हलके करावे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करू."

5 रेहोबोअमने उत्तर दिले, "माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या." तेव्हा लोक माघारी गेले.

6 तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, "या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?"

7 त्यांनी उत्तर दिले, "जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील."

8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. 9 त्याने त्यांना विचारले, "जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?"

10 त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, "हे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की, ‘तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू तुम्ही हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. 11 माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ "

12 तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, "तीन दिवसांनी माझ्याकडे परत या." 13 वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले, 14 तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, "माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन." 15 अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे परमेश्वराने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

16 राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले:

"दावीदामध्ये आमचा काय वाटा,

इशायच्या मुलाशी आमचा काय भाग,

इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन!

दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!"

असे म्हणत इस्राएलचे सर्व लोक परत घरी गेले. 17 परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

18 हदोराम10:18 काही मूळ प्रतींनुसार अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला. 19 याप्रकारे इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.