सर्वकाही कुरकुर न करता करा
12 यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या. 13 कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे.
14 जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, 15 म्हणजे, "तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे"2:15 अनु 32:5 म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल. 16 तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल.