Pular para o conteúdo
Publicidade

उपदेशक 8

1 सुज्ञासारखा कोण आहे?

गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे?

मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते

आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते.

राजाचे आज्ञापालन

2 मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. 3 राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो. 4 कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, "हे तू काय करतो" असे त्याला कोण म्हणणार?

5 त्याच्या आज्ञांचे पालन करणार्‍यांना इजा होणार नाही,

आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल.

6 जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात,

तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते.

7 जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते,

तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार?

8 जसे कोणत्या मनुष्याला वार्‍यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही,

तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही.

जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते,

तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही.

9 मी हे सर्व पाहिले, सूर्याखाली होत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे माझे चित्त लावले. अशीही एक वेळ आहे, जेव्हा एखादा व्यक्ती दुसर्‍यावर स्वतःच्याच यातनेमुळे अधिकार चालवितो. 10 जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे.

11 जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात. 12 जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल. 13 दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.

14 पृथ्वीवर आणखी काही घडत आहे जे निरर्थक आहे: जे दुष्टासाठी निर्धारित असते ते नीतिमानाला मिळते व नीतिमानाच्या वाट्याचे दुष्टाला मिळते. मी म्हणतो हे सुद्धा अर्थहीन आहे. 15 म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.

16 सुज्ञानाला जाणावे व पृथ्वीवर केलेले परिश्रम पाहावे—लोक जे अहोरात्र झोप न घेता करतात—म्हणून मी माझे चित्त लावले, 17 तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्‍या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.