Publicidade

Eclesiastes 3

प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय

1 प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे,

आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:

2 जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ,

पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ,

3 ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे;

विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;

4 रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे;

शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;

5 दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;

आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ;

6 शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ;

साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;

7 फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ;

मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;

8 प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ;

युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.

9 कामकर्‍यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो? 10 परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे. 11 त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत. 12 मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्‍याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही. 13 प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे. 14 मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात.

15 जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे;

जे होणार, तेही होऊन गेले आहे.

गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील.

16 मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले:

दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते.

आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती.

17 मी स्वतःला म्हटले,

"परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट

या दोघांचाही न्याय करणार,

कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार,

प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ."

18 मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, "परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत. 19 खरोखर मानवाचे नशीब हे इतर प्राण्यांप्रमाणे आहे; सारखेच नशीब हे दोघांसाठी वाट पाहत असते: जसा एक मरतो, तसाच दुसराही मरतो. सर्वांना सारखाच श्वास आहे; इतर प्राण्यांपेक्षा मानवाला अधिक लाभ नाही. सर्वकाही व्यर्थ आहे. 20 सर्वकाही एकाच ठिकाणी जाणार आहेत; सर्व मातीतून येतात आणि पुन्हा मातीत जाऊन मिळतात. 21 मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?"

22 मी हे पहिले की मानवांनी स्वतःच्या कामात आनंद मानावा, यापेक्षा त्यांच्यासाठी अधिक काही चांगले नाही, कारण हेच विधिलिखित आहे. ते गेल्यानंतर काय घडेल ते पाहण्यासाठी त्यांना कोण परत आणणार?

Veja também

Publicidade
Eclesiastes
Ver todos os capítulos de Eclesiastes
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-