Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ती 16

हागार आणि इश्माएल

1 अब्रामाला साराय आपली पत्नी हिच्यापासून मूलबाळ नव्हते. पण सारायला हागार नावाची इजिप्तची एक दासी होती; 2 सारायने अब्रामाला म्हटले, "याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील."

आणि अब्रामाने तिचा शब्द मानला. 3 अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले. 4 तो हागारसोबत निजला आणि ती गर्भवती झाली.

जेव्हा तिला आपण गर्भवती झाल्याचे लक्षात आले, तेव्हा ती तिच्या मालकिणीचा तिरस्कार करू लागली. 5 मग साराय अब्रामाला म्हणाली, "माझ्याशी होत असलेल्या अन्यायास तुम्ही जबाबदार आहात. वास्तविक, मी तिला तुमच्या हातात दिले आणि आता जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, ती मला तुच्छ मानू लागली आहे. याहवेह माझ्या व तुमच्यामध्ये न्याय करो."

6 यावर अब्रामाने सारायला उत्तर दिले, "तुझ्या दासीवर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुला जे योग्य वाटेल ते तिच्याशी कर." तेव्हा सारायने हागारची छळणूक केली; आणि हागार तिच्यापासून पळून गेली.

7 शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली. 8 तो तिला म्हणाला, "अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?"

हागारेने उत्तर दिले, "मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे."

9 तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, "तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा." 10 दूत पुढे म्हणाला, "मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही."

11 याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले,

"आता तू गर्भवती आहेस

आणि तुला एक पुत्र होईल.

तू त्याचे नाव इश्माएल16:11 इश्माएल अर्थात् परमेश्वर ऐकतात असे ठेव,

कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.

12 तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल;

त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल

व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल;

आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये

शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील."

13 तिच्याशी बोलणार्‍या याहवेहला तिने हे नाव दिले: "मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात," कारण ती म्हणाली, "जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे." 14 म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई16:14 बएर-लहाई-रोई अर्थात् मला पाहणार्‍या जिवंत परमेश्वराची विहीर असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.

15 मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले. 16 हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.