इसहाक आणि अबीमेलेख
1 त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला. 2 याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, "खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा. 3 या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन. 4 मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. 5 कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले." 6 म्हणून इसहाक गरारातच राहिला.
7 जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, "ती माझी बहीण आहे." कारण "ती माझी पत्नी आहे" असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, "या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे."
8 तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे.