Publicidade

Jonas 2

1 मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली. 2 तो म्हणाला:

"माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला

आणि त्यांनी मला उत्तर दिले.

मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली

आणि तुम्ही माझी हाक ऐकली.

3 तुम्ही मला खोलवर,

समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले

आणि प्रवाहाने मला घेरले;

आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ

यांनी मला झाकून टाकले.

4 मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून

दूर करण्यात आले आहे;

तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे

दृष्टी लावेन.’

5 बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले,

माझ्या सभोवताली खोल डोह होता;

माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.

6 मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो;

मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो.

तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा,

तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.

7 "जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते,

तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले,

आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे,

तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.

8 "जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात

ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.

9 परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने,

तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन.

मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन.

मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ "

10 मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

Veja também

Publicidade
Jonas
Ver todos os capítulos de Jonas
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-