Pular para o conteúdo
Publicidade

मीखाह 3

पुढारी आणि संदेष्टे यांना फटकारणे

1 तेव्हा मी म्हणालो,

याकोबाच्या पुढार्‍यांनो,

इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका.

तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,

2 तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता;

तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता,

आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;

3 तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता,

त्यांची कातडी सोलता

आणि त्यांची हाडे मोडता,

आणि पातेल्यात शिजविण्यासाठी

मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.

4 मग ते याहवेहचा धावा करतील,

पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही.

त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे

याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील.

5 याहवेह असे म्हणतात:

"माझ्या लोकांना

चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे,

त्यांना काही खायला मिळाल्यास

ते ‘शांती’ ची घोषणा करतात.

परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो

त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.

6 म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही,

आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय!

या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल

आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.

7 द्रष्ट्यांना लाज वाटेल

आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील.

ते सर्व आपली मुखे झाकतील

कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही."

8 परंतु माझ्याबाबतीत म्हणाल,

तर याकोबाला त्याचे अपराध

आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी

मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने

परिपूर्ण आहे.

9 अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो,

इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका,

तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता

आणि चांगल्या गोष्टी विकृत करता;

10 सीयोनला रक्तपाताने

आणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे.

11 तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात,

तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात,

व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात.

तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात,

"याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय?

आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही."

12 म्हणून तुमच्यामुळे,

सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल,

यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल,

मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.