प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय
1 प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे,
आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:
2 जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ,
पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ,
3 ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे;
विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;
4 रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे;
शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;
5 दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;
आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ;
6 शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ;
साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;
7 फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ;
मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;
8 प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ;
युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.