10 मग त्यापैकी एकजण म्हणाला, "पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल."
त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती. 11 आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; 12 म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, "मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?"