Pular para o conteúdo
Publicidade

नीतिसूत्रे 23

सातवे सूत्र

1 जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस,

तेव्हा तुझ्यासमोर काय23:1 किंवा कोण आहे हे चांगले लक्षात घे,

2 आणि जर तू खादाड असशील

तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.

3 त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस,

कारण ते भोजन फसविणारे आहे.

आठवे सूत्र

4 श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस;

स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.

5 तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते,

कारण पंख उगवताच

गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.

नववे सूत्र

6 कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस,

त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;

7 कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे

जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो.

तो तुला म्हणतो "खा आणि पी"

परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.

8 जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील

आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल.

दहावे सूत्र

9 मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस,

कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील.

अकरावे सूत्र

10 पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस

किंवा अनाथाची शेती बळकावू नकोस.

11 कारण त्यांना वाचविणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे;

ते त्यांचा खटला तुझ्याविरुद्ध चालवितील.

बारावे सूत्र

12 तुझे चित्त शिक्षणाकडे,

आणि तुझे कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव.

तेरावे सूत्र

13 मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस;

जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.

14 छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर

आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण कर.

चौदावे सूत्र

15 माझ्या मुला, जर तुझे अंतःकरण सुज्ञ असेल

तर माझे मन खरोखरच आनंदी होईल;

16 जेव्हा तुझे ओठ न्यायपूर्ण शब्द बोलतील

तेव्हा माझा अंतरात्मा उल्हास करेल.

पंधरावे सूत्र

17 तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस,

परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा.

18 कारण तुला तुझ्या भवितव्यामध्ये निश्चितच आशा आहे,

आणि तुझी आशा नाश पावणार नाही.

सोळावे सूत्र

19 माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो

आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर:

20 जे अतिमद्यपान करतात

किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,

21 कारण मद्यपी व खादाड गरीब होतात,

आणि गुंगीत असणार्‍यांना फाटके कपडे घालावे लागतील.

सतरावे सूत्र

22 आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,

आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.

23 सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको—

सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.

24 नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो;

जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.

25 तुझे वडील आणि आई आनंदी असावेत;

आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!

अठरावे सूत्र

26 माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे

आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी,

27 कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे,

आणि परस्त्री म्हणजे एक अरुंद विहीर आहे.

28 एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते

आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.

एकोणविसावे सूत्र

29 कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे?

कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत?

कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत?

30 जे मद्यपानासाठी घुटमळतात,

जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात.

31 जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको,

जेव्हा ते कपामध्ये चमकते,

जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

32 शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते

आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.

33 तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील,

आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल.

34 तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा,

जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील.

35 आणि तू म्हणशील, "त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही!

त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही!

जेव्हा मी जागा होईन,

तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.