10 सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
11 तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो,
आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
12 आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते,
त्याचे अहित करीत नाही.
13 ती लोकर व ताग मिळविते
आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
14 ती एका व्यापारी जहाजासारखी आहे,
तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
15 ती रात्र सरताच उठते;
आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते
आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
16 ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते;
तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
17 ती उत्साही व कष्टाळू आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
18 तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते,
आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
19 ती तिच्या हातांमध्ये चाती धरते,
आणि ती बोटांनी चरकी चालविते.
20 ती गरिबांना उदारहस्ते देते
आणि गरजूंना सढळ हाताने देते.