ज्ञानार्जनाचे फायदे
1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
2 ज्ञानाचे ऐकशील.
आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
3 जर तू विवेकासाठी आरोळी करशील,
आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
4 जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील,
आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
5 तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल,
आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
6 कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.