4 "मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?
तुला समजत असेल तर सांग.
5 तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार!
तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले?
6 तिचे पाये कशावर रोवले आहे,
किंवा तिची कोनशिला कोणी बसवली—
7 जेव्हा प्रभात तार्यांनी एकत्र गाणी गाईली
आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?
8 "सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला
तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले,
9 जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली
आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले,
10 जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या
आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली,
11 जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही;
तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’?