Publicidade

Jó 42

इय्योब

1 मग इय्योबाने याहवेहला म्हटले,

2 "तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे;

तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.

3 तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’

खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्‍या गोष्टी,

त्याविषयी मी बोललो.

4 "तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार;

मी तुला प्रश्न करणार,

आणि तू मला उत्तर देशील.’

5 माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते

परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.

6 म्हणून मी माझाच तिरस्कार करतो,

आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो."

समारोप

7 याहवेह या गोष्टी इय्योबाशी बोलल्यानंतर, ते एलीफाज तेमानीला म्हणाले, "मी तुझ्यावर व तुझ्या दोन्ही मित्रांवर रागावलो आहे, कारण माझा सेवक इय्योब बोलला, त्याप्रमाणे तुम्ही माझ्याबद्दल जे सत्य ते बोलला नाहीत. 8 म्हणून आता सात बैल व सात मेंढे घेऊन माझा सेवक इय्योब याच्याकडे जा आणि स्वतःसाठी होमबलीचे अर्पण करा. माझा सेवक इय्योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची प्रार्थना स्वीकारेन व तुमच्या मूर्खतेनुसार तुमच्याशी वागणार नाही. माझा सेवक इय्योब माझ्याबद्दल जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही माझ्याबद्दल बोलला नाही." 9 मग एलीफाज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी यांनी याहवेहनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले आणि याहवेहने इय्योबाची प्रार्थना मान्य केली.

10 इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले 11 त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे व सोन्याची अंगठी दिली.

12 याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती. 13 आणि त्याला सात मुले व तीन मुली होत्या. 14 त्याने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसरीचे कसीया व तिसरीचे केरेन-हप्पूक असे ठेवले. 15 संपूर्ण देशामध्ये इय्योबाच्या मुलींएवढ्या सुंदर मुली कुठेही नव्हत्या; त्यांच्या पित्याने त्यांच्या भावांबरोबर त्यांनाही वतन दिले.

16 त्यानंतर इय्योब एकशेचाळीस वर्षे जगला; त्याने आपली लेकरे व त्यांची लेकरे अशा चार पिढ्या पाहिल्या. 17 इय्योब वयस्कर व पूर्ण परिपक्व होऊन मरण पावला.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-