Publicidade

Jó 27

इय्योबाचे त्याच्या मित्रांशी शेवटचे भाषण

1 इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:

2 "ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे,

आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो,

3 की जोपर्यंत मी जिवंत आहे,

आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे,

4 तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत,

आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही.

5 मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे;

मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही.

6 माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही;

मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही.

7 "माझे शत्रू दुष्‍टांप्रमाणे,

आणि माझे विरोधी अन्यायीप्रमाणे होवोत!

8 कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले,

आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे?

9 जेव्हा त्यांच्यावर संकट येईल,

तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?

10 सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय?

सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?

11 "परमेश्वराच्या सामर्थ्‍याविषयी मी तुम्हाला शिकवेन;

सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही.

12 तुम्ही सर्वांनी स्वतः हे बघितले आहे,

मग या निरर्थक गोष्टी का बोलता?

13 "दुष्टासाठी परमेश्वर जे नेमून देतात ते हेच आहे,

कठोर मनुष्याला सर्वसमर्थाच्या हातून हाच वारसा मिळतो:

14 त्याला कितीही मुलेबाळे असली, तरी त्यांचा शेवट तलवारीने होणार;

त्याच्या संततीस कधीही पुरेसे अन्न मिळणार नाही.

15 आणि त्यातून जे वाचतील, ते रोगाला बळी पडतील,

आणि त्यांच्या विधवादेखील त्यांच्यासाठी शोक करणार नाहीत.

16 दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो

व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,

17 जे काही तो साठवून ठेवतो, तरी न्यायी ती वस्त्रे पांघरतील,

आणि निरपराधी त्याचे रुपे आपसात वाटून घेतील.

18 त्याने बांधलेले घर पतंगाच्‍या कोशाप्रमाणे आहे,

पहारेकर्‍याच्या झोपडीप्रमाणे ते आहे.

19 धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो;

पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.

20 संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात;

रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.

21 पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो;

त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.

22 तो त्याच्या सामर्थ्यापासून पळ काढण्याचा बेत करतो

तरी त्याच्यावर दया न होता तो दूर फेकला जाईल.

23 टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल

आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-