Publicidade

Jó 12

इय्योबाचा प्रतिसाद

1 मग इय्योबाने उत्तर दिले,

2 "खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात,

आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल!

3 परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे;

मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही.

या सर्वगोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?

4 "मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे,

मी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले—

नीतिमान आणि निर्दोष असूनही मी केवळ चेष्टेचा विषय झालो आहे!

5 सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो;

मात्र ज्यांचे पाय घसरतात त्यांच्यावर ती वार करते.

6 हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात,

आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात—

ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.

7 "परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील,

किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;

8 अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल;

किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.

9 या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की

याहवेहच्या हाताने हे केले आहे?

10 कारण प्रत्येक प्राण्याचा जीव,

आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.

11 जशी अन्नाची चव जिभेला समजते,

तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का?

12 वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही?

दीर्घ आयुष्याने समज येते की नाही?

13 "ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत;

सल्ला आणि समज त्यांचेच आहे.

14 ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही;

ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.

15 परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो;

आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.

16 पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत;

फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.

17 ते मंत्र्यांना विवस्त्र करतात

आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.

18 राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात

आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.

19 ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात

स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात.

20 विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात

आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.

21 ते सरदारांवर तिरस्कार ओततात,

आणि सबळांना दुर्बल करतात.

22 ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात

आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.

23 ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात;

ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात.

24 ते पृथ्वीवरील अधिकार्‍यांची बुद्धी काढून घेतात;

आणि त्यांना दिशाहीन असे भटकण्यास लावतात.

25 ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात;

त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-