Publicidade

Jó 10

1 "मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे;

म्हणून मनमोकळे करून मी

माझ्या जिवाच्या कडूपणाने बोलेन.

2 मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका,

पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.

3 माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का,

दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता,

आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?

4 तुम्हाला मानवी डोळे आहेत का?

मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?

5 तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का,

किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,

6 म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत

आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;

7 मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे

आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही?

8 "तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे.

आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?

9 तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा,

पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?

10 दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का

तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,

11 तुम्ही मला त्वचा व मांस दिले,

आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?

12 तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली,

आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला.

13 "परंतु हे तुम्ही तुमच्या हृदयात गुप्त ठेवले,

आणि मला माहीत आहे की हे तुमच्या मनामध्ये होते:

14 मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे

आणि माझ्या पापांबद्दल शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही.

15 जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो!

मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही,

कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे

आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे.

16 मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार

आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.

17 तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता,

आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता;

तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.

18 "मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले?

कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.

19 मी जर कधी अस्‍तित्‍वातच आलो नसतो,

किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते!

20 माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का?

मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा;

21 म्हणजे जिथून परत येणे होत नाही,

जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,

22 जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे,

तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे,

आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-