Publicidade

Salmos 147

यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती

1 परमेश्वराची स्तुती करा,

कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे;

ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.

2 परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो;

तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.

3 तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,

आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.

4 तो ताऱ्यांची मोजणी करतो;

तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.

5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे;

त्याची बुद्धी मोजू शकत नाही.

6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो;

तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.

7 गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा.

वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.

8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो,

आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो,

तो डोंगरावर गवत उगवतो.

9 तो प्राण्यांना

आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.

10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही;

मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.

11 जे परमेश्वराचा आदर करतात,

जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.

12 हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर;

हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.

13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत;

त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.

14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो;

तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.

15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो;

त्याचा शब्द फार वेगाने धावतो.

16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो;

तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.

17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो;

त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?

18 तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो;

तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.

19 त्याने याकोबाला आपले वचन,

इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.

20 त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही;

आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत.

परमेश्वराची स्तुती करा.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-