Publicidade

Salmos 88

मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे

1 हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,

मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.

2 माझी प्रार्थना ऐक;

माझ्या आरोळीकडे लक्ष दे.

3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे,

आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.

4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत;

मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.

5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे;

अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो,

ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस,

ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.

6 तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात,

काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.

7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे,

आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.

8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात.

त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे;

मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.

9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत;

हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे.

मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.

10 तू मृतांसाठी चमत्कार करशील काय?

जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?

11 तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा

मृतांच्या जागी घोषणा होईल का?

12 तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात

किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?

13 परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;

सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.

14 हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?

तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?

15 मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे;

मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.

16 तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे,

आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.

17 त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे;

त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.

18 तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस.

माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-