Publicidade

Salmos 92

देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती
शब्बाथ दिवसाचे स्तोत्र

1 परमेश्वराची उपकारस्तुती करणे

आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.

2 सकाळी तुझे वात्सल्य,

आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.

3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर

आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.

4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे.

तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.

5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत,

तुझे विचार फार गहन आहेत.

6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत,

किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,

7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले,

आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले;

तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.

8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.

9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा;

सर्व वाईट करणारे विखरले आहेत.

10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस;

मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.

11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे;

जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.

12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल,

तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत;

ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.

14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील;

ते टवटवीत आणि हिरवे राहतील.

15 हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे;

तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-