Publicidade

Salmos 46

देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे.

1 देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,

जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.

2 म्हणून जरी पृथ्वी बदलली,

जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.

3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,

आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.

4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या

पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.

5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;

देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.

6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;

तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.

7 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे.

याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.

8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा,

त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.

9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;

तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;

तो रथ जाळून टाकतो.

10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;

राष्ट्रात मी उंचावला जाईन;

मी पृथ्वीवर उंचावला जाईन.

11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे;

याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-