Publicidade

Salmos 112

1 याहवेहचे स्तवन करा.

याहवेहचे भय बाळगणारे,

आणि त्यांच्या आज्ञापालनामध्ये आनंद मानणारे आशीर्वादित आहेत.

2 त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल;

नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.

3 संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील,

आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.

4 सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो;

ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.

5 ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते,

जे आपला व्यवहार न्यायाने करतात.

6 निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही;

त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.

7 वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही;

याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.

8 यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत;

शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.

9 गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात,

त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते;

गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.

10 दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील;

ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील,

आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-