Publicidade

Salmos 92

एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित.

1 याहवेहची स्तुती गाणे,

आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.

2 प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची,

आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,

3 दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे,

आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.

4 हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता;

तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.

5 हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत!

तुमचे विचार किती गहन आहेत!

6 मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही;

मूर्खांना हे समजत नाही की,

7 दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात

व त्यांची भरभराट होते,

तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.

8 परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!

9 हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा,

निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल,

आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

10 परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे;

नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.

11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला;

माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.

12 नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील,

ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;

13 जे याहवेहच्या घरात रोपलेले,

आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.

14 वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील,

आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.

15 ते ही घोषणा करतील, "याहवेह नीतिमान आहेत;

ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-