Publicidade

Salmos 30

एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र

1 याहवेह मी तुमची प्रशंसा करेन,

कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे

आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.

2 हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली

आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.

3 याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले;

तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.

4 अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा,

त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.

5 त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो,

पण त्यांची कृपा जन्मभर राहते.

विलाप करणे केवळ रात्रभर राहील,

परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

6 माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो,

"मी कधीही डगमगणार नाही."

7 याहवेह, तुमच्या कृपेने

मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते,

परंतु तुम्ही आपले मुख लपविले,

तेव्हा मी भयभीत झालो.

8 याहवेह मी तुमचा धावा केला,

मी प्रभूला कृपेची विनवणी केली.

9 मी चिरनिद्रीत होण्यापासून

मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ?

माती तुमची स्तुती करेल काय?

ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?

10 याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा;

याहवेह मला साहाय्य करा.

11 तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले.

तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,

12 जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे.

याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-