Publicidade

Salmos 77

संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत.

1 मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला;

परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.

2 माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली;

रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो,

तरीही माझे सांत्वन झाले नाही.

3 परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो;

मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. सेला

4 तुम्ही माझे डोळे बंद होऊ दिले नाही;

मला बोलताही येत नव्हते इतका मी खिन्न झालो होतो.

5 मी पूर्वीच्या दिवसांबद्दल,

फार पूर्वीच्या वर्षांबद्दल विचार केला;

6 रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे;

माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:

7 "प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय?

ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?

8 त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय?

त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय?

9 परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय?

क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?" सेला

10 मग मी विचार केला, "खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे:

की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.

11 मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन;

पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.

12 मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन

आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन."

13 हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत.

आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?

14 चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात;

तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.

15 जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत,

त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे. सेला

16 परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले,

जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले!

त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.

17 मेघांनी मुसळधार पाऊस पाडला;

मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले;

तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.

18 चक्रीवादळामध्ये गर्जना झाली;

विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले;

पृथ्वी थरारली आणि डळमळली.

19 तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले,

तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती;

तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.

20 मोशे व अहरोन यांच्याद्वारे

मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-