Publicidade

Salmos 99

1 याहवेह राज्य करतात,

राष्ट्रे थरथर कापोत;

ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत;

सर्व पृथ्वी कंपित होवो.

2 अतिमहान होत सीयोनातील याहवेह;

ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.

3 राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत—

याहवेह पवित्र आहेत.

4 राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे—

तुम्ही याकोबात

निष्पक्षपात प्रस्थापित केला;

जो न्यायसंगत व रास्त आहे.

5 आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा,

व त्यांच्या चरणी आराधना करा;

याहवेह पवित्र आहेत.

6 मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते,

व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते;

यांनी याहवेहचा धावा केला,

आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.

7 ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले;

त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.

8 याहवेह, आमच्या परमेश्वरा,

तुम्ही त्यांना उत्तर दिले;

त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली,

तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.

9 आपल्या परमेश्वराची थोरवी गा,

आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा,

कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-