Publicidade

Salmos 65

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. एक गीत.

1 हे परमेश्वरा, तुमची स्तुती सीयोनेत अपेक्षित आहे;

तुम्हाला केलेला नवस तिथे पूर्ण करण्यात येईल.

2 तुम्हीच प्रार्थनेचे उत्तर देता,

म्हणून तुमच्याकडे सर्व लोक येतील.

3 आमची अंतःकरणे पापांनी भरलेली असली,

तरी तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली.

4 तुमच्या अंगणात येऊन राहण्यासाठी

तुम्ही ज्यांची निवड केली, ते धन्य!

आम्ही तुमच्या मंदिरातील पवित्रस्थानाच्या

उत्कृष्ट पदार्थांनी संतुष्ट होऊ.

5 तुमच्या अद्भुत आणि नीतिकार्याद्वारे तुम्ही आम्हाला प्रत्युत्तर देता,

परमेश्वर, आमचे तारणकर्ता,

पृथ्वीच्या टोकापर्यंत आणि दुर्गम समुद्रापर्यंत,

तुम्ही सर्व भक्तांची आशा आहात.

6 आपल्या महान शक्तीने त्यांनी पर्वतांना

त्यांच्या ठिकाणी स्थिर ठेवले आहे.

7 तुम्ही महासागराच्या खवळलेल्या

लाटांना शांत करता

आणि सर्व राष्ट्रांचे कोलाहल शांत करता.

8 संपूर्ण पृथ्वी तुमच्या महाकृत्याने विस्मित होते;

सूर्योदय आणि सूर्यास्त ही

आनंदाने जयघोष करीत आहेत.

9 तुम्ही या भूमीची काळजी घेता

व ती सिंचनासाठी देता.

आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे

म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत,

कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे.

10 तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता;

पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता.

11 तुम्ही तुमच्या औदार्यासह वर्षास शिरोभूषण चढविता

आणि तुमच्या गाड्या समृद्धीने ओसांडत आहेत.

12 राने हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादून टाकता;

टेकड्या आनंदाची वस्त्र परिधान करतात.

13 हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात

आणि दर्‍यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते;

ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-