Publicidade

Salmos 26

दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, माझा न्याय करून मला निर्दोष जाहीर करा,

मी दोषरहित जीवन जगलो;

याहवेह, मी न डगमगता

तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.

2 याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा,

माझे मन आणि हृदयाची पारख करा.

3 कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो

आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.

4 कपटी लोकांसोबत मी बसत नाही

किंवा ढोंगी लोकांची संगत मी धरत नाही.

5 दुष्कर्म करणार्‍यांच्या सर्व सभा मला घृणास्पद वाटतात

आणि मी त्या दुष्टांच्या संगतीत बसत नाही.

6 मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन

आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,

7 म्हणजे उंच आवाजाने तुमची उपकारस्तुती करेन

आणि तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करेन.

8 याहवेह, मला तुमचे निवासस्थान आवडते,

इथेच तुमचे वैभव वसती करते.

9 पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला,

आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.

10 त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत,

त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.

11 मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन;

मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.

12 माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत;

महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-