Publicidade

Salmos 24

दावीदाचे एक स्तोत्र.

1 पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे.

जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

2 कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला,

आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

3 याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल?

त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

4 ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे,

जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही,

जो खोटी शपथ वाहत नाही.

5 त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल.

त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

6 हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे,

याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला

7 अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा;

प्राचीन द्वारांनो, उच्च व्हा;

गौरवाच्या राजाला आत प्रवेश करू द्या.

8 असा गौरवशाली राजा कोण आहेत?

याहवेह जे समर्थ व प्रबळ आहेत,

जे युद्धात पराक्रमी आहेत.

9 अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा;

प्राचीन द्वारांनो, सताड उघडा;

महातेजस्वी महाराज आत येतील.

10 हा गौरवशाली राजा कोण आहेत?

सर्वशक्तिमान याहवेह—

तेच आहेत गौरवशाली राजा. सेला

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-