Publicidade

Salmos 28

दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे;

तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात.

माझ्यासाठी आपले कान बंद करू नका;

जर तुम्ही उत्तर दिले नाही,

तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.

2 मी पवित्रस्थानाकडे

माझे हात उंच करतो;

साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो;

माझी दयेची आरोळी ऐका.

3 दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका,

जे अन्याय करतात,

शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे,

परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.

4 जे शासन त्यासाठी उचित आहे,

ते त्यांना पुरेपूर करा;

त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा;

त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.

5 कारण याहवेहच्या महान कृत्यांचे

व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही.

याहवेहच त्यांचा नाश करतील.

मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.

6 याहवेहची स्तुती करा,

कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.

7 याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत;

माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात.

माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे,

माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.

8 याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत,

आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.

9 तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या;

त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-