Publicidade

Salmos 34

दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला.

1 मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन;

माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.

2 याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन;

हे ऐकून दीनजन हर्ष करोत.

3 तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा;

आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.

4 कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले;

त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.

5 जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात;

त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.

6 या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला;

त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.

7 याहवेहचे भय धरणार्‍याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात

आणि त्याला ते सोडवितात.

8 याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या;

जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.

9 याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा,

कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.

10 तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील,

परंतु याहवेहचा शोध घेणार्‍यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.

11 माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका;

याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.

12 तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो

आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,

13 तर तू आपली जीभ वाईटापासून

आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.

14 वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर;

शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.

15 याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत,

आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

16 परंतु जे वाईट करतात, याहवेहचे मुख त्यांच्याविरुद्ध आहे,

त्यांची नावे ते पृथ्वीवरून पुसून टाकतात.

17 याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून,

त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.

18 याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात

आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.

19 नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही,

परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.

20 ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात,

त्यातील एकही मोडणार नाही.

21 दुष्टांची दुष्टाई त्यांचा नाश करेल;

जे नीतिमानांचे शत्रू आहेत, त्यांना शिक्षा होईल.

22 जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील;

जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-