Publicidade

Salmos 63

यहूदीयाच्या रानात असताना रचलेले दावीदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, तुम्ही माझे परमेश्वर आहात,

मी तुमचा कळकळीने शोध करतो;

या कोरड्या आणि वैराण भूमीत

माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला झाला आहे;

माझे सर्वस्व तुमच्यासाठी किती

उत्कंठित झाले आहे.

2 तुमचे सामर्थ्य आणि गौरव

मी तुमच्या पवित्रस्थानी पाहिले आहे.

3 कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे,

माझे ओठ तुमचे गौरव करतील.

4 माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन

आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन.

5 उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल;

गीत गाणार्‍या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.

6 माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो;

रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.

7 कारण तुम्ही माझे साहाय्य आहात,

तुमच्या पंखांच्या सावलीत मी गीत गातो.

8 मी तुम्हाला बिलगून राहतो;

तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.

9 जे मला मारू इच्छितात त्यांचा नाश होईल;

ते पृथ्वीच्या खोल रसातळी जातील.

10 तलवारीच्या धारेने ते पडतील;

कोल्ह्यांचे ते भक्ष्य होतील.

11 परंतु राजा परमेश्वरामध्ये उल्हास करेल;

जे लोक परमेश्वराची शपथ घेतात, ते सर्व त्याचे गौरव होईल;

परंतु लबाडांची तोंडे बंद होतील.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-