Publicidade

Salmos 57

संगीत दिग्दर्शकासाठी. "अल्तश्केथ" चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीद शौलाच्या उपस्थितीपासून निसटून गुहेत लपून बसला त्या संदर्भाचे आहे.

1 माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा.

कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे;

संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या

छायेखाली आश्रय घेईन.

2 जे मला निर्दोष ठरवितात,

त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.

3 ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील;

जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला

परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.

4 सिंहांनी मला घेरले आहे;

ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,

ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे

अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.

5 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;

तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

6 माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे—

संकटात मी वाकून गेलो होतो.

माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता—

परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला

7 हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे,

माझे अंतःकरण खंबीर आहे;

मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.

8 हे माझ्या जिवा, जागृत हो!

अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा!

मी प्रातःकाळाला जागृत करेन.

9 हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन,

मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

10 कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे;

तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.

11 हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;

तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-