Publicidade

Salmos 62

संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र.

1 परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे;

माझे तारण त्यांच्याकडून येते.

2 फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण;

तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.

3 तुम्ही सर्वजण या एका मनुष्याला खाली पाडावयास,

कुठपर्यंत माझ्यावर प्रहार करीत राहणार?

मी तर एका वाकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे.

4 मला उच्च स्थानावरून खाली

पाडण्याचा त्यांचा बेत आहे;

त्यांना खोटे बोलणे आवडते;

ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात,

परंतु मनातून शाप देतात. सेला

5 तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल;

माझी आशा त्यांच्यापासून आहे.

6 खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण,

तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.

7 माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे;

तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.

8 माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा;

आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा,

कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला

9 साधारण मानव श्वासमात्र आहेत;

विशिष्ट मानव फक्त मिथ्या आहेत;

तराजूत वजन केले की ते हलकेच भरतील;

ते सर्व श्वासमात्र आहेत.

10 पिळवणूकीच्या धनावर विश्वास ठेवू नका

किंवा चोरी केलेल्या वस्तूंवर व्यर्थ आशा ठेवू नका;

जरी तुमची संपत्ती वाढत असेल,

तरी तिच्यावर मन लावू नका.

11 परमेश्वर एकदा बोलले आहेत,

मी दोनदा हे ऐकले आहे:

"सामर्थ्य याहवेहचेच आहे,

12 आणि प्रभू, तुमच्यामध्ये प्रेमदया सदैव असते;"

आणि, "तुम्ही प्रत्येकाला त्याच्या

कृत्यानुसार प्रतिफळ देता."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-