Publicidade

Salmos 95

1 या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या;

आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या.

2 कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ;

आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.

3 कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत;

समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.

4 पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत,

आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.

5 समुद्र त्यांचेच आहेत, कारण ते त्यांनी उत्पन्न केले,

आणि कोरडी भूमीही त्यांचीच हस्तरचना आहे.

6 या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या,

आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू;

7 कारण ते आपले परमेश्वर आहेत.

आपण त्यांच्या कुरणातील प्रजा

आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.

आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकली, तर किती बरे!

8 "मरीबाह येथे असताना केली तशी,

जसे मस्सा च्या दिवशी तुम्ही रानामध्ये केले तसे, तुमची अंतःकरणे कठीण करू नका.

9 माझे अनेक चमत्कार पाहिलेले असतानाही,

तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी फार संतापलो;

मी म्हणालो, ‘या लोकांची हृदये भटकलेली आहेत

आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.’

11 मग मी रागाने शपथ घेतली की,

‘ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ "

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-