Publicidade

Salmos 143

दावीदाचे एक स्तोत्र.

1 हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका,

कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या,

तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून

माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.

2 आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका,

कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.

3 माझ्या शत्रूने पाठलाग करून मला पकडले आहे;

त्याने मला जमिनीवर तुडविले आहे;

जसे दीर्घकाळाच्या मृतास ठेवावे,

तसे त्याने मला अंधारात जखडून ठेवले आहे.

4 माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे;

भीतीने मी हतबल झालो आहे.

5 मला पुरातन काळचे स्मरण होत आहे;

तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो,

आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.

6 मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो;

शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला

7 हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या;

माझा आत्मा दुर्बल झाला आहे.

तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका,

नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.

8 प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या,

कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे.

माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे,

म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.

9 याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा,

कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.

10 तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा,

कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात;

तुमचा उत्तम आत्मा

मला नीतिमार्गाने नेवो.

11 हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा;

तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.

12 माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा;

माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा,

कारण मी तुमचा सेवक आहे.

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_18-40-07-