Publicidade

Salmos 3

दावीदाचे स्तोत्र. जेव्हा तो त्याचा पुत्र अबशालोम याच्यापासून पळाला.

1 याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे!

कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत!

2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात,

"परमेश्वर त्याची सुटका करणार नाही." सेला

3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात.

माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात.

4 मी याहवेहचा धावा करतो,

आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला

5 मी पहुडतो आणि झोप घेतो;

मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात.

6 असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील,

तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.

7 याहवेह, उठा!

हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा!

माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा;

त्या दुष्टांचे दात पाडून टाका.

8 कारण सुटका याहवेहपासूनच आहे.

तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-