Publicidade

Salmos 75

संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत

1 हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो,

तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे;

लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.

2 तुम्ही म्हणाल, "मी निर्धारित वेळ निवडतो;

मी सर्वांना रास्त न्याय देतो.

3 पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले,

तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला

4 मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’

आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.

5 आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका;

आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ "

6 पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून

मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.

7 मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत:

ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्‍यास उंच करतात.

8 कारण याहवेहच्या हातात

मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे;

तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे;

सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.

9 मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन;

मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.

10 ते म्हणतात, "सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन,

परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन."

Veja também

Publicidade
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-15_21-32-39-