1 आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते;
अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.
2 दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात;
प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.
3 या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही,
त्यात आवाजही नाही;
4 तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते,
कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.
परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे.
5 आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे,
जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो.
6 तो आकाशाच्या एका टोकास उगवतो
दुसर्या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो;
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
7 याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत;
ते आत्म्याला ताजेतवाने करतात.
याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत,
ते भोळ्यांना सुज्ञ करतात.
8 याहवेहचे नियम योग्य आहेत,
ते हृदयास आनंद देतात,
याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत,
त्या नेत्रांना प्रकाश देतात.