संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र
1 याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नका;
आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
2 तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा;
त्वरेने येऊन मला सोडवा;
माझ्या आश्रयाचे खडक व्हा,
मला वाचवण्यासाठी बळकट दुर्ग व्हा.
3 कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात;
तुमच्या नावाकरिता मला मार्गदर्शन करा आणि मला चालवा.
4 माझ्यासाठी लावलेल्या सापळ्यांमघून तुम्ही मला बाहेर काढा,
कारण तुम्हीच माझे आश्रयदुर्ग आहात.
5 मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो;
माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.